Ad will apear here
Next
मी गाताना गीत तुला लडिवाळा...
वास्तवतेचे चटके सोसूनही मन निबर होऊ न देता संवेदनशीलता ज्यांनी जपली त्या कविवर्य ना. धों. महानोरांचा १६ सप्टेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील त्यांच्या ‘मी गाताना गीत तुला लडिवाळा’ या अंगाईबद्दल...
.........................................
काव्यविश्वातच नाही तर समस्त मानवजातीच्या भावविश्वात अंगाईचं एक अढळ स्थान आहे. एक तर अंगाई हा शब्द उच्चारल्याबरोबर आई आणि बाळ डोळ्यापुढं येतं आणि कानामनात शब्दसूरांनी भारलेली अंगाई ऐकू येऊ लागते. अगदी कवी दत्त यांच्या 'बा नीज गडे' पासून किंवा आई-आजीच्या तोंडी असलेलं मौखिक परंपरेनं आलेलं अंगाई गीत असो, ते ऐकलं की मनाचा हळवा कप्पा हळूहळू उघडला जातो. 'निज निज माझ्या बाळा' असं म्हणणारी, दिवसभर कष्टलेले हात पदराला पुसत बाळाला जोजवणारी आई काळाच्या पडद्याआड दिसेनाशी झालीय, पण कॉम्प्युटरचा कीबोर्ड बाजूला सारुन ममतेनं बाळाला जोजवणारी, अंगाई गुणगुणणारी आई अजूनही सुदैवानं आपल्या देशात घराघरात दिसते. आज अंगाईबद्दल लिहावं असं वाटलं याचं कारण 'एक होता विदूषक' या चित्रपटातील अंगाई ऐकताना काळीज गलबलून गेलं. निसर्गकवी, रानकवी ना. धों. महानोर या मातृहृदयी कवीला नकळत वंदन केलं. वास्तवतेचे चटके सोसूनही मन निबर होऊ न देता संवेदनशीलता ज्यांनी जपली त्या कविवर्य ना. धों. महानोरांचा वाढदिवस १६ सप्टेंबरला असतो.

आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या 'मैफल शब्दसुरांची' या मालिकेत मी कवी ना. धों. महानोर यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. त्यांच्या वयाचा अमृतमहोत्सव तीन वर्षांपूर्वी झालाय. तसंच त्यांच्या 'रानातल्या कविता' या काव्यसंग्रहाचाही तेव्हाच सुवर्णमहोत्सव झाला होता! पावसाच्या थेंबाला 'थेंब अमृताचे' असं म्हणणाऱ्या कवीच्या शब्दसुरांच्या मैफलीत एकेक कविता, त्या कवितेचं स्वरांनी मोहरणं, त्याबरोबरच कवितेशी आणि निसर्गाशी असलेलं कवीचं घट्ट नातं हळूवारपणे उलगडत होतं. कवितेचा आणि कवीचा जीवनप्रवास जाणून घेतांना, सृजनाच्या लावण्यखुणा पाहताना मी स्वत: हरवून गेले होते.

अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका आदिवासी परिसरातील पळसखेडे गावातील निरक्षर आई-वडील, साहित्याचा वारसा तर सोडाच साधी साक्षरताही दूर असलेल्या गावात महानोरांचा जन्म झाला. गावातल्या लोककला, लोकगीतं आणि आईनं जात्यावर म्हटलेल्या ओव्या हाच साहित्यसंस्कार बालपणी रुजलेला. लोकसंस्कृतीची अस्सल छाप कवीमनावर पडलेली. 'त्या लोकसंस्कृतीतलं गीत-संगीत, शब्दकळा यांचाच माझ्यावर संस्कार झाला, मौखिक समृध्द साहित्य, कला यांचंच बीज मनावर खोलवर रुजलं,’ असं स्वत: कवी महानोर सांगतात. झुळझुळणारे झरे, पक्ष्यांची किलबिल आणि हिरव्यागार रानाची ओढ यातूनच त्यांची कविता फुलत गेली. शेतात, मातीत राबता राबता कवितेचे लवलवते कोंब कवीच्या मनाचं रान फुलवत होते. शेताचा लळा हिरव्या बोलीचे शब्द खुलवत होते. त्यांच्या 'रानातल्या कविता' या पुस्तकात ते म्हणतात.. 

ह्या शेताने लळा लाविला असा असा की
सुखदु:खाला परस्परांशी हसलो - रडलो,
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्यांच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो...

रानातला गंध ल्यालेल्या महानोरांच्या कविता हळूहळू कालानुरूप बदलत गेल्या. चित्रपटांच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या रचना, फक्त पावसाच्या पावसाळी कविता, पालखीचे अभंग, समाजातल्या विविध स्तरातल्या स्त्रियांची कहाणी सांगणाऱ्या कविता, तर कधी 

किती दिस आले गेले
किती जुन्या आठवणी
तुझ्या कारुण्य गीतांची
कधी सांगतो कहाणी.. 

असं सांगता सांगता आईच्या आठवणींनी व्याकुळ झालेली कविता आपल्याही डोळ्यांच्या कडा ओल्या करून जाते. 

किती दिस आले गेले मी ही थकलो ग ऽ ऽ आई
माझ्या दु:खाचे गाठोडे तुला सांगणार नाही,
तुझे दु:ख भोगण्याचे माझ्या अंगी येवो बळ
तुझ्या अथांग गंगेचे पाणी वाहू दे निर्मळ...

असं सांगणारे कवी ना. धों. महानोर यांनी 'एक होता विदूषक' या चित्रपटासाठी गाणी लिहिली. पु. ल. देशपांडे, डॉ. जब्बार पटेल, आशा भोसले, रवीन्द्र साठे आणि संगीतकार आनंद मोडक या सर्वांनी महानोरांच्या गीतरचनांचं अक्षरश: सोनं केलं. या चित्रपटात गाण्यांमधील किती विविधता महानोरांनी कथेच्या मागणीनुसार जपली! लावणी, गण, विदूषकाचं गाणं आणि सर्वांत आवडलेली ही अंगाई... 

हा कंठ दाटूनी आला.
मी दु:खाच्या बांधून पदरी गाठी
जपले तुज ओटीपोटी
कधी डोळ्यांना काजळ तुज भरतांना
गलबला जीव होतांना...

लोककलावंताचं जिणं कवीने पाहिलेलं असल्यामुळे त्या आईची व्यथा, वेदना अंगाईतून व्यक्त होते. काळजाला पीळ पाडणारे शब्द गाताना खुद्द आशाताईंना हुंदका फुटल्याची आठवण महानोरांनी मला मुलाखतीदरम्यान सांगितली होती.

खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट निजताना
ते ऐकुनी गा मन हे फडफड होई
पाळणा म्हणे अंगाई...

काय कल्पना आहे कवीची बघा, पाळणाच अंगाई म्हणू लागलाय.. महानोरांनी त्यांच्या एका गीतात 'देवालय मृदंग झालं जी' असं लिहिलंय याची आठवण झाली. पाळणा आणि अंगाई, बाळ आणि आई ही सारी एकरूपता दाखवण्याची ताकद कवीच्या प्रतिभेत आहे म्हणून तर ही अंगाई ध्वनिमुद्रित होत होती तेव्हा आशाताईंचा कंठ दाटून आला.. ध्वनिमुद्रण थोडावेळ थांबवावं लागलं.. आशाताई महानोरांना म्हणाल्या, 'कवी, इतकं चांगलं लिहायचं नसतं रे.. गाणं अवघड झालं मला..’ त्यांनी डोळे पुसले. अंगाई रेकॉर्ड झाली आणि रसिकांच्या काळजात रुतून बसली. 

शाळेत असतांना, कवी दत्त यांची अंगाई म्हणतांना डोळे भरून यायचे. गुरुजी सांगायचे एक गरीब आई बाळाला जोजवतेय, घरातलं दारिद्र्य, खाण्यासाठी अन्नाचा कण नाही पण सत्याला सोडू नकोस असं सांगणारी आई कवी दत्त यांच्या कवितेत भेटली होती. पण आता प्रत्यक्ष ना. धों. महानोरांसारखा प्रतिभाशाली कवीच शब्दसुरांची मैफल सजवीत होते. सांगत होते त्यांनी लिहिलेल्या अंगाईबद्दल. प्रत्येक आईला आपल्या लेकराबद्दल असलेली चिंता, त्याच्या आयुष्याचा झोका असाच वरवर जावा, सुखानं झुलत रहावा, ईश्वरानं त्याचा सांभाळ करावा असं सांगता सांगता अंगाई गाणारी आई कवी महानोरांनी साकारली. 

आयुष्याला नको काजळी काळी
ईश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला.
मी गाताना गीत तुला लडिवाळा 
हा कंठ दाटूनी आला...
   
खरं सांगते, हे सगळं लिहिताना माझाही कंठ दाटून आलाय... ही अंगाई रवींद्र साठे यांनीसुद्धा अतिशय समरसून गायली आहे. सुख-दु:खाच्या गोष्टी कवी आपल्या कवितेतून मांडतो. ती कविता कवीची राहत नाही, ती रसिकांची होऊन जाते. म्हणून तर कवी महानोरांची ही कविता अमृतस्वरांनी गाते आहे...  ‘घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे' अशा अमृतथेंबांनी त्यांच्या उर्वरीत आयुष्याचं रान आबादानी राहू दे, अमृतक्षणांनी भरलेल्या आयुष्यात अशी काव्यसंपदा फुलू दे. आशाताईंचाही वाढदिवस आठ सप्टेंबरला साजरा झाला आणि १६ सप्टेंबरला महानोरदादांचा वाढदिवस साजरा करतांना विलक्षण योगायोग वाटत आहे. महानोरांच्या कितीतरी कवितांना आशाताईंचा चिरतरुण स्वर लाभला आहे. महानोरांनी लिहिलेली अंगाई आशाताईंच्या करुणामयी वात्सल्यस्वरांनी चिंब भिजली आहे.

निसर्गकवी ना. धों. महानोरांना लक्ष लक्ष शुभेच्छा देऊ या आणि स्वरांनी मोहरलेली कविता पुन्हा पुन्हा अनुभवूया...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZSLBG
Similar Posts
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...
फिरुनी नवी जन्मेन मी... वैविध्यपूर्ण गाणी गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आठ सप्टेंबर हा जन्मदिवस नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ ही सुधीर मोघे यांची सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाताईंच्या स्वरांनी सजलेली कविता ...
ही वाट दूर जाते... कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन नुकताच (१२ ऑक्टोबर) होऊन गेला. तसेच ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन २६ ऑक्टोबर रोजी आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या शांताबाईंनी लिहिलेली आणि हृदयनाथ यांनी संगीतबद्ध केलेली ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा.
श्रावणात घननिळा बरसला... दर वर्षी श्रावण येतो... प्रत्येक वेळी तो नवा वाटतो... ‘श्रावणात घन निळा बरसला’ या मंगेश पाडगावकरांच्या निसर्गप्रतिमांनी नटलेल्या कवितेसारखा, लतादीदींच्या निर्मळ स्वरांसारखा आणि खळेअण्णांनी बांधलेल्या, वरवर पाहता सोप्या, पण गाताना अवघड असलेल्या चालीसारखा... ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात पाहू या याच कवितेबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language